बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी शुद्ध बियाण्याचे महत्व - डिजिटल बळीराजा

बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी शुद्ध बियाण्याचे महत्व

बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी आपल्या खरीप हंगामामध्ये आता चालू असलेल्या कपाशी बियाणे मका बियाणे सोयाबीन बियाणे तसेच इतर वाणाचे बियाणे मार्केटमध्ये आलेले आहे आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये एक जून पासून खरेदी करण्यासाठी शेतकरी वर्ग दुकान वरती गर्दी करत आहे आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे बियाणे मार्केटमध्ये डुबलीकेट पणा असू शकतो याची खात्रीशीर काळजी आपल्याला घ्यायची आहे.पिशवीतील किंवा बॉक्समधील बियाणे पेरणीसाठी वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. बियाण्याची पिशवी हि नेहमी खालच्या बाजूने फोडावी. म्हणजेच ज्या बाजूला टॅग असेल ती बाजू तशीच राहू द्यावी. तसेच बॉक्स असेल तर तर त्यावरील माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. बियाण्याचा थोडा नमुना पिशवी किंवा बॉक्समध्ये राखून ठेवावा. म्हणजे बियाणे सदोष आढळल्यास तक्रार केल्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांना सदर बियाण्याचा नमुना देता येईल. बोगस बियाणे आणि बोगस औषधांच्या कंपन्या कृषी विभागाच्या धाडसत्रात सापडतही आहेत. शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी सर्व पातळीवर प्रयत्नशील आहेच,पण शेतकऱ्यांनीही स्वत: आपली फसवणूक होवू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे.

 

शुद्ध बियाण्याचे महत्व:

शेतीचे उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असून यामध्ये जमीन, पाणी, हवामान, खते, पिक संरक्षण, आंतर मशागत आणि वापरण्यात येणारे बियाणे या बाबींचा मुख्यत्वेकरुन समावेश होतो.बियाणे पेरणीसाठी वापरताना त्याची उगवणक्षमता, अनुवंशिक आणि भौतिक शुद्धता याबाबत काळजी घेणे आवश्यक असते. जर बियाण्याची उगवणक्षमता आणि शुद्धता न तपासता बियाणे पेरणीसाठी वापरल्यास त्याची उगवण चांगली होत नाही किंवा त्याचा जोम कमी असतो. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. काही शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले मागील हंगामातील धान्य पेरणीसाठी वापरतात. धान्य आणि बियाणे यातील मुख्य फरक म्हणजे बियाणे शुद्ध आणि उगवणक्षम असते तर धान्य म्हणून वापरलेले बियाणे उगवणक्षम आणि शुद्ध असतेच असे नाही. म्हणून पेरणी करताना शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचेच बियाणे वापरले पाहिजे. तरच अपेक्षीत उत्पादन मिळू शकेल.

 

बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी

सर्वप्रथम शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती घ्यावी. त्यावर बियाणे खरेदी करणाऱ्याचे नाव, पिकाचे व जातीचे नाव, गट क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, विक्रेत्याची सही इत्यादी नोंदी असाव्यात. कोणतेही बियाणे घेताना परवानाधारक कृषी केंद्रधारक विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. बियाण्याची वैधता तपासणी दिनांकापासून ९ महिने असते तर नूतनीकरण केलेल्या बियाण्याची वैधता ६ महिने असते. याबाबी पाहूनच बियाण्याची खरेदी करणे महत्त्वाचे असते. बियाणे खरेदी करताना पिशवीच्या लेबलवर दिलेली माहिती तपासून पहावी. त्यामध्ये प्रामुख्याने बियाण्याची उगवणक्षमता, भौतिक शुद्धता, बियाण्याची चाचणीची तारीख इत्यादी काळजीपूर्वक वाचावे. प्रमाणित बियाण्याच्या खुणचिठ्ठीवर (टॅगवर) अधिकाऱ्यांची सही असल्याची खात्री करून घ्यावी. या कृषी विभागाच्या सूचना शेतकऱ्यांनी लक्षात घ्याव्यात म्हणजे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक होणार नाही.

 

बियाण्याची उगवणक्षमता कशी तपासावी?

  • बियाण्याची एखाद्या लॉटची उगवणक्षमता तपासण्यासाठी त्याच्या प्रतिकात्मक नमुन्यातील कमीत कमी 400 बी तपासावे लागते.
  • ज्या बियाण्याची उगवणक्षमता तपासावयाची आहे, त्यास कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी आणि ते शुद्ध बियाण्यातूनच घेतलेले असावे.
  • प्रयोगशाळेत उगवणक्षमता तपासण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या साहित्यामध्ये उगवण कक्ष (जर्मिनेटर) हे मुख्य उपकरण आहे.
  • यामध्ये बियाण्याच्या उगवणीसाठी आवश्‍यक लागणारे तापमान आणि आर्द्रता राखता येते, तसेच बियाणे उगवणीस ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कागद वापरतात. याला “टॉवेल पेपर’ असे म्हणतात.
  • ज्यामध्ये ओलावा राखला जातो आणि त्यामुळे बियाण्याची उगवण व वाढ होण्यास मदत होते.

 

बियाण्याची बीजप्रक्रिया

 

बीजप्रक्रिया म्हणजे बियाण्यावर त्याच्या लागवडीपूर्वी करावयाची प्रक्रिया होय.त्यात बियाण्यांची पारख करणे, त्यांतील सकस बिया निवडणे, त्यांवर लेपन इत्यादी योग्य प्रक्रिया करणे, त्यांची उगवणशक्ती तपासणे आदी बाबींचा समावेश असतो.बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, पीक जोमदार येते, जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते व जमिनीतील अपायकारक जीवाणूंसून पिकाचे संरक्षण होते.

बियाण्याची उगवणशक्ती तपासण्यासाठी बियाणे हे पेरणीपूर्वी किमान १५ दिवस अगोदर खरेदी करतात. या बियाण्याच्या साठ्यातील सुमारे १०० दाणे काढून ते, ज्या शेतात त्यांची पेरणी करावयाची आहे तेथील माती एका मातीच्या कुंडीत घेऊन पेरतात. अशा बियाण्याचे सुमारे ८ ते १० दिवसात कोंब निघतात. किती कोंब निघाले यावरून त्या विशिष्ट बियाण्याची उगवणशक्तीची टक्केवारी कळते. समजा,त्यापैकी ८३ कोंबच उगवले तर त्या बियाण्यांची उगवणशक्ती ८३% आहे असे अनुमान काढता येते.त्याप्रमाणात पेरणी करता येते.

 

सदोष बियाणे कसे ओळखावे  

१) ज्या वेळेस आपण प्रमाणित बियाणे खरेदी करतो, त्या बियाण्याच्या पिशवीवर किंवा टॅगवर प्रमाणित केलेल्या प्रमाणकापेक्षा किंवा दिलेल्या माहितीबरोबर जर बियाण्यांची गुणवत्ता नसेल, तर त्यास सदोष बियाणे म्हणतात.
२) यामध्ये प्रामुख्याने त्याची उगवणक्षमता पोषक परिस्थितीत पेरल्यानंतर खूपच कमी असेल, तर बियाणे सदोष आहे असे समजावे.
३) त्याची भौतिक शुद्धता म्हणजेच त्यातील काडीकचरा, इतर पिकांचे बियाणे, तणांचे बी यांचे प्रमाण टॅगवरील माहितीपेक्षा जास्त असल्यास सदर बियाणे सदोष आहेत, असे समजावे.
४) सदर बियाण्याची अनुवांशिक शुद्धता नसल्यास म्हणजेच त्या बियाण्याचा एकसारखेपणा, झाडांचे बाह्य गुणधर्म यामध्ये एकसारखेपणा नसल्यास तसेच झाडांची कणसे, शेंगा, ओंब्या यामध्ये विविधता आढळल्यास सदर बियाणे अनुवांशिकदृष्ट्या शुद्ध नाहीत, असे म्हणतात.
४) शेतकऱ्यांनी वातावरणातील बदलाचा विचार करूनच बियाणाची निवड करावी, कारण जरी बियाणे शुद्ध असले, तरी वातावरणातील बदलामुळेदेखील काहीवेळा अपेक्षित उत्पादन मिळत नाही.

 

 

 

बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी
बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी

 

बियाणे सदोष आढळल्यास घ्यावयाची काळजी 

 

  1. बियाणे साधारणत ५ ते ७ दिवसांत उगवते. यासाठी शेतकऱ्याने प्रत्येक पीक अवस्थेचे निरीक्षण करावे. बियाण्याची उगवण कमी आहे असे आढळल्यास तत्काळ खरेदी केलेल्या लॉटच्या बियाण्याच्या नमुन्याची बियाणे निरीक्षणे, पंचायत समिती यांना तपासणी करणेबाबत समक्ष सांगावे.
  2. बियाण्यामध्ये अनुवांशिक किंवा भौतिक शुद्धतेत दोष आढळल्यास प्रथम पंचायत समितीच्या किंवा जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज देऊन त्यांच्याकडून पाहणी करून घ्यावी.
  3. तक्रार अर्ज सादर करताना बियाणे खरेदी केलेल्या बिलाची सत्यप्रत जोडावी. पेरणी झाल्यानंतर उगवणक्षमता कमी झाल्याचे आढळून आल्यास, तसेच कणसात दाने न भरल्यास, बियाणे सदोष असल्याची तक्रार करता येऊ शकते.
  4.  बियाण्याची उगवणक्षमता कमी असल्यास संबंधित विक्रेता/ उत्पादक यांच्यावर बियाणे कायदा १९६६ मधील कलम १९ नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते
  5. शेतकऱ्यांना खरीप, रब्बी हंगामात शुद्ध बियाणे मिळावे, कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती, खरीप हंगाम तक्रार निवारण कक्ष, भरारी पथक, यांसारख्या समित्या गठित करण्यात येतात.

 

शेतकरी मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या लेख मध्ये सांगितलेले आहे की, बियाणे खरेदी करताना तुम्हाला कोण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते .आणि त्यामुळे आपली फसवणूक होत नाही .जर आपण या सर्व गोष्टीचे काळजी खात्रीशीर पणे आपण लक्ष दिले. तर आपल्या कोणत्याही बियाण्याची फसवणूक होत नाही.

आपल्याला हा संपूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना पण ही बातमी नक्की कळवा कारण त्यांची पण फसवणूक झाली नाही पाहिजे.

 

हे पण वाचा 

मेथीची लागवड 

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना 2023 

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना 2023 

अटल भूजल योजना 2023 चे नवीन अपडेट

 

Leave a Comment